(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबीयांशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील BG Goyal and Company या दुकानावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान आवश्यक परवाना नसल्याचे आणि काही माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाल्याने दुकान सील करण्यात आले.
कारवाईदरम्यान सुमारे 4 हजार किलो सुका मेवा आणि मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत 8 लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढील तपास आणि नमुन्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाची राष्ट्रपतींकडे न्यायाची मागणी
दरम्यान, केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून या हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्याची मागणी केली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशीही त्यांनी विनंती केली आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मुलाच्या हत्येनंतर अवघ्या 20 दिवसांत कुटुंबातील आणखी एका सदस्याचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. “आमच्याकडे आता न्यायाचीच आशा उरली आहे,” अशी भावनिक विनंती त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
तुकाराम मुंढे यांची राज्यभर भेसळविरोधी धडक मोहीम
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थांतील भेसळीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेले दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात आले होते. या कारवाईची पाळेमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात सापडली होती. या धडक कारवाईनंतर आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द गावातील नागरिकांनी मंचर-भीमाशंकर मार्गावर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ फलक लावत त्यांच्या कामाचे स्वागतही केले. तर राज्यव्यापी मोहिमेदरम्यान FDA ने एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकून 14,054 किलो दुग्धजन्य पदार्थ आणि 24,632 लिटर संशयास्पद दूध जप्त केले. या साठ्याची अंदाजे किंमत 43.31 लाख रुपये असून, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने तो नष्ट करण्यात आला.
82 हॉटेल्सची तपासणी, 9 परवाने निलंबित
विशेष तपास मोहिमेत राज्यातील 82 हॉटेल्स आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. गंभीर त्रुटी आढळल्याने 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 33 हॉटेल्सना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. मुंबईतील Foodvista India तसेच पुण्यातील National 360 आणि Happy Da Dhaba यांच्यावरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
गुटखा-पानमसाला विक्रीवरही कारवाई
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रीप्रकरणी 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांना कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास FDA च्या 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

