( नवी दिल्ली )
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवारी (7 सप्टेंबर) संसद संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात झालेल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली. मात्र, नेहमीप्रमाणे पहिल्या रांगेत न बसता त्यांनी सभागृहाच्या शेवटच्या रांगेत जागा घेतली. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
याबाबत गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मोदी शेवटच्या रांगेत खासदारांसोबत बसलेले दिसतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हीच भाजपा संघटनेची ताकद आहे. येथे प्रत्येक कार्यकर्ता समान आहे.”
कार्यशाळेत जीएसटी सुधारणांना पाठिंबा देणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच, कर दर कमी केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दोन करस्लॅब रद्द करून फक्त 5 आणि 18 टक्के हे दर कायम ठेवण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर 40 टक्क्यांचा नवीन करस्लॅब लागू करण्यासही मान्यता देण्यात आली. या बदलांना देशाच्या अप्रत्यक्ष करव्यवस्थेतील मोठी सुधारणा मानले जात आहे.
भाजप खासदारांच्या या कार्यशाळेचे चार सत्रे होणार असून खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीत शंभर टक्के मतदानासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान उद्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत. सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील असून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, तर बी. सुदर्शन रेड्डी हे तेलंगणातील आहेत.

