(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी गावात अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पोचरी गावासह फुणगूस खाडी परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.
संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी पोचरी येथील मधलीवाडीत आपल्या घरात एकटी होती. याच संधीचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही आरोपीने हे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा करून ३ जून रोजी रात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ नुसार गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक डी. साळवी करत आहेत.
दरम्यान, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

