(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठी राजकीय घडामोड घडली. महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार असलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीची रंगत अचानक ओसरली आहे. त्यांच्या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेकडे जाण्याचा मार्ग आता बिनविरोधपणे मोकळा झाला आहे.
उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी घडलेल्या या अनपेक्षित घडामोडीने कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे, बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याची घटना अधिकच चर्चेचा विषय ठरली.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगण्याची चिन्हे होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे बाळ माने यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बाळ माने यांनी माघार घेतल्याने संभाव्य राजकीय संघर्ष टळला असून कोकणातील ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकणातील राजकारणात परिचित असलेले बाळ माने यांचा राजकीय प्रवासही लक्षवेधी राहिला आहे. काही वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये सक्रिय होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट)मध्ये प्रवेश केला आणि मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ८३१ मतदारांमध्ये महायुतीचे संख्याबळ प्रभावी मानले जात होते. उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेना (शिंदे गट)कडे २३६, भाजपकडे १५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६३ मतदारांचे बळ आहे. तर शिवसेना (ठाकरे गट)कडे ५५ आणि काँग्रेसकडे ५० सदस्यांचे संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे पारडे जड मानले जात असतानाच बाळ माने यांच्या माघारीने निवडणुकीतील सर्वच शक्यता संपुष्टात आल्या असून, अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेत बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोकणातील राजकारणात अखेरच्या क्षणी घडलेल्या या घडामोडीमुळे अनेक राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

