(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी श्रामणेर शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी सांगता झाली. खंडाळा विभागात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रत्नागिरी तालुका तसेच बावीस खेडी संघटनेतील विविध वाड्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात १२ पुरुष आणि १३ महिलांनी सहभाग घेतला होता.
या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ. राजेश जाधव यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिबिराची जबाबदारी सांभाळली. विविध अडचणींवर मात करत त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिरादरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन तसेच सायंकाळी दूध व फळांची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. राजेश जाधव आणि आयु. ऋतुजा जाधव यांनी संपूर्ण १० दिवस त्यागी वृत्तीने स्वतःला या धार्मिक सेवेसाठी समर्पित केले होते.
बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी, बावीस खेडी संघटना वाटद-खंडाळा आणि सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये अजाहन मिलिंद बोधी, भंते संघकीर्ती मुनी आणि भंते परमानंद यांनी बौद्ध धम्म जनजागृती, प्रचार-प्रसार, साधना, त्याग, शिस्त, ध्यान, संघजीवन आणि धार्मिक जीवनाचे स्वरूप यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या कठोर साधनेविषयीही माहिती दिली. बुद्धांच्या शांततेच्या मार्गाचे अनुकरण करण्याचे आवाहनही पूज्य भंतेनी उपस्थितांना केले.
पूज्य भंतेना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते. भंतेनी विधिवत बुद्धपूजा करून शिबिरार्थींचे चिवर काढले. सांगता समारंभात सर्व शिबिरार्थींनी आपले अनुभव व्यक्त करत शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बावीस खेडी संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव कुलदीप जाधव, सभापती रजत पवार, सुरेश सुर्वे (गुरुजी), स्वप्नील जाधव, बौद्धाचार्य संदीप जाधव, बौद्धाचार्य दीपक गमरे, कांबळे, चंद्रकांत पवार, महामाया सुर्वे आदींनी विशेष सहकार्य केले. तसेच समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक धम्मदान देऊन योगदान दिले.
सांगता समारंभासाठी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, सचिव सुहास कांबळे, मंगेश सावंत, बावीस खेडी संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सभापती रजत पवार, सचिव कुलदीप जाधव, किशोर पवार, संतोष पवार, जयभीमवाडी सैतवडेचे अध्यक्ष सुवेश चव्हाण, ऋतुजा जाधव, साक्षी जाधव, संज्योत चव्हाण, दीपाली गमरे, अंकिता जाधव, नितीन सुर्वे, सुमित जाधव, सागर पवार, जितू पवार, प्रकाश चंद्रकांत जाधव, बौद्धाचार्य प्रकाश जाधव आदी धम्मबंधू आणि भगिनी उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत डॉ. राजेश जाधव यांचे विशेष अभिनंदन केले. विशेष म्हणजे, डॉ. राजेश जाधव यांनी यापूर्वी २५ एप्रिल रोजी दीक्षाभूमी वाटद-खंडाळा येथे जनगणना आणि जात उपवर्गीकरण विषयावर जनजागृती मेळाव्याचेही आयोजन केले होते. समाजाभिमुख विविध उपक्रमांमुळे डॉ. राजेश जाधव आणि आयुष्यमती ऋतुजा जाधव यांच्याकडे समाजात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते.

