( पाली / प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची गत ३ वर्षापासून रखडलेली आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे मुंबई आझाद मैदानावर प्रखर आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिला होता. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अखेर ग्रामविकास विभाग अॅक्टिव्ह मोडवर आला असून गत ३ वर्षापासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत व्हीसीद्वारे बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत.
आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्यावत करण्याच्या काल मर्यादित सूचना द्याव्यात.ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता कार्यवाही सुरू केली आहे. संच मान्यता पूर्ण होतात, ३१ मे अखेरपर्यंतची रिक्त पदे प्रथम आंतरजिल्हा बदलीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार असून यानंतरच शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
पेसा क्षेत्रातील जिल्ह्यात शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात २० टक्के व नॉन-पेसा क्षेत्रात ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता उपलब्ध करून देण्यात यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरती प्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करण्यात यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करिता ३१ मे अखेरपर्यंतचे रिक्त पदे गृहीत धरण्यात यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता स्वतंत्र वेळापत्रक निर्गमित करण्यात यावे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही शिक्षक भरती पूर्वी राबविण्यात यावी, काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसल्यास तेथे शून्य बिंदू नामावली गृहीत धरून अशा शिक्षकांच्या स्वगृही बदल्या करण्यात याव्यात. या प्रमुख मागण्या निवेदनातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या समक्ष सादर करण्यात आल्या होत्या.
गत ३ वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षकांची होती. आमच्या निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीबाबत कार्यवाही सुरू केल्याने बदली प्रतीक्षेतील १२ हजारावर शिक्षकांना न्याय मिळणार असल्याचे समाधान आहे. मात्र पाठपुरावा सुरूच राहील.
—महेश ठाकरे,राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना

