(रत्नागिरी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार दिपस्तंभाप्रमाणे रहावा, हा विचार या माध्यमातून जनसामान्यात रुजवणे हे आपले सर्वांचे काम आहे, या स्मारकातून भगवान गौतम बुध्दांचा विचार कशा पध्दतीने पोहचतोय याचा विचार आणि अभ्यास झाला पाहिजे असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
पाली येथे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 3 टक्के वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व दीक्षाभूमी इमारतीचे पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन काल लोकार्पण झाले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, उपसभापती गजानन धनावडे, पंचायत समिती सदस्य पद्मजा कांबळे, समाज कल्याण सहाय्यक दीपक घाटे, पाली पंचक्रोशी बौध्द समाज मंडळ अध्यक्ष व सरपंच विठ्ठल सावंत, सल्लागार एम.बी. कांबळे, जि.प. सदस्य ॲङ सुयोग कांबळे, माजी जि.प. सदस्य रामभाऊ गराटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, भंते कश्यपजी थेरो, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी जागा देण्यासाठी सहकार्य केले. 23 वर्षानंतर आज या स्मारकाच्या इमारतीचे उद्घाटन झाले आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानकर्त्याचे हे स्मारक सर्व समाजासाठी आहे. ते मर्यादित नसावे. संविधान बदलणार आहेत, अशी अफवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी पसरली होती. शेवटी ती अफवाच ठरली. बापजन्मात संविधान कुणीही बदलू शकत नाही. अशी वेळ आलीच तर त्याच्या विरोधात आम्ही समाजाचं नेतृत्व करु. एखादा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या स्मारकाचा काम करत असेल, तर समाजाने त्याला पाठींबा द्यायला हवा. विकास हीच माझी जात, विकास हाच माझा धर्म समजून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो. भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एकसंघपणे सामाजिक काम करायला हवे.
विकासात्मक विधायक काम करताना त्याच्यामागे उभे राहण्याचा संकल्प करा. आखाती देशातील माणसे युध्द नको बुध्द हवा, असं सांगत आहेत. या स्मारकामधून बाबासाहेबांचा विचार दीपस्तंभाप्रमाणे रहावा. त्यांचे विचार जनमाणसात रुजविणे हे आपले सर्वांचे काम आहे, असेही ते म्हणाले.
पाली पंचक्रोशी बौध्द समाज मंडळाचे सल्लागार एम. बी. कांबळे यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

