(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी मद्यधुंद वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, अवघ्या दोन दिवसांत अनेक चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या नाकाबंदी आणि गस्तीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी रंगेहात पकडत मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
चिपळूण शहरातील बहादुरशेख नाका परिसरात मुंबई-गोवा महामार्गावरील विशेष तपासणी मोहिमेदरम्यान पोलिसांनी तीन दुचाकीस्वारांवर कारवाई केली. दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, अलोरे-शिरगाव परिसरातही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शिरगाव येथील मोरया पेट्रोल पंपाजवळ तपासणीदरम्यान ज्युपिटर, मेस्ट्रो आणि ॲक्टिव्हा या वाहनांचे चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित वाहनचालकांवर गुन्हे नोंदविले.
सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायरा पेट्रोल पंप परिसर तसेच वहाळफाटा पुलाखाली राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेतही दोन मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. भरधाव आणि अनियंत्रित पद्धतीने वाहन चालविताना त्यांना अडवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या व्यापक कारवाईमुळे जिल्ह्यातील मद्यधुंद वाहनचालकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, दारू पिऊन वाहन चालवणे हा केवळ कायद्याचा भंग नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालविणे टाळावे आणि जबाबदार नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करावे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

