(संगमेश्वर / एजाज पटेल)
एकीकडे चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे महावितरणचा निष्काळजी आणि बेजबाबदार कारभार उघड होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील मांजरे-कोपरखरी परिसरातील २५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्राची (डीपी) चोरी होऊन सुमारे ३५ हजार रुपयांचे शासकीय नुकसान झाले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला; मात्र एवढे गंभीर प्रकरण घडूनही महावितरण प्रशासन अद्याप जागे झालेले दिसत नाही.
चोरीनंतर उर्वरित किमती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र आजतागायत दोन रोहित्रे उघड्यावर बेवारस अवस्थेत पडून आहेत, तर एक निकामी रोहित्र खांबावर धोकादायक स्थितीत लटकत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणचा कारभार नेमका निष्काळजीपणाचा आहे की चोरट्यांना अप्रत्यक्ष मदत करणारा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जाकादेवी फीडरच्या शेवटच्या टोकावरील गावाकडे दुर्लक्ष?
भौगोलिकदृष्ट्या मांजरे (कोपरखरी) हे गाव संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीपट्ट्यात येत असले, तरी या भागाचा वीजपुरवठा रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी उपकेंद्रातून केला जातो. जाकादेवी फीडरच्या अखत्यारीतील या गावात २४ नोव्हेंबर २०२४ ते ४ मे २०२६ या कालावधीत नादुरुस्त रोहित्र उघड्यावर पडून होते.
महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. याच निष्काळजीपणाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोहित्रातील सुमारे ३५ किलो तांब्याचे वायडिंग चोरून नेले. गुन्हा दाखल होऊनही संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे अद्याप उघडले नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नियम धाब्यावर, पोलिसांवर अतिरिक्त ताण
महावितरणच्या नियमानुसार एखादे रोहित्र निकामी झाल्यानंतर ते तात्काळ हटवून सुरक्षित गोदामात जमा करणे बंधनकारक असते. मात्र मांजरे परिसरात तब्बल दीड वर्ष उलटूनही या नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरी झाल्यानंतरही साहित्य उघड्यावरच ठेवण्यात येत असल्याने पुन्हा चोरी अथवा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महावितरणच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका आता पोलीस प्रशासनालाही बसत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी पोलिसांना महावितरणच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात महावितरणच्या या कारभाराची जोरदार चर्चा सुरू असून, केवळ अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सरकारी मालमत्ता दीर्घकाळ उघड्यावर ठेवून चोरीस खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उर्वरित साहित्याची पुन्हा चोरी झाल्यास त्याला जबाबदार कोण, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जाणार का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

