(सातारा)
सातारा जिल्हा परिषदेत भाजपाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये तडीपार गुंडाच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी आपल्या कार्यालयात मित्राचा वाढदिवस साजरा करताना तडीपार गुंड बिऱ्या उर्फ अमित कदम उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेदरम्यान झालेल्या राजकीय गदारोळाची चर्चा अजूनही सुरू असतानाच आता आणखी एका वादाने जोर धरला आहे. समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांच्या केबिनमध्ये शंभू साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. मात्र, या सेलिब्रेशनदरम्यान तडीपार गुंड बिऱ्या उर्फ अमित कदम उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा परिषदेसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या. तडीपार गुंड खुलेआम सरकारी कार्यालयात फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्न
सातारा जिल्हा परिषदेला राज्यातील प्रतिष्ठित राजकीय वारसा लाभला आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचा प्रभाव असलेल्या या जिल्हा परिषदेत यंदाच्या सत्तास्थापनेवेळी मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. आमदार, मंत्री आणि पोलिसांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे सातारा जिल्हा परिषद राज्यभर चर्चेत आली होती. त्यातच आता तडीपार गुंडाच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये वाढदिवस साजरा झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्रतिमेला पुन्हा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.
भाजपवर विरोधकांचे निशाण
भाजपने विविध राजकीय समीकरणांच्या जोरावर सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेत तडीपार गुंडांना थेट पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश मिळतो, मात्र सामान्य नागरिकांना सहज भेट मिळते का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तडीपार गुंडांच्या मुक्त वावरावर पोलिस प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऋषिकेश धायगुडे यांचा खुलासा
या संपूर्ण प्रकरणावर समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मी माझ्या केबिनमध्ये असताना माझे मित्र शंभू साळुंखे वाढदिवसानिमित्त आले होते. आम्ही केक कापला. त्यांच्यासोबत कोण उपस्थित होते, याची मला कल्पना नव्हती. हे सर्व अनावधानाने घडले.”

