(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने लांजा आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली, झाडे कोसळली, वीजवाहिन्या तुटल्या तसेच शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रशासनासमवेत विविध भागांची पाहणी केली.
वादळी पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून थेट फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. गावोगावी भेट देत त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांना धीर दिला. अनेक ठिकाणी कोसळलेली झाडे, उडालेली घरांची छपरे आणि खंडित झालेल्या वीजपुरवठ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आमदार सामंत यांनी लांजा आणि राजापूरच्या तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्तांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वादळी पावसामुळे शेती, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान शासन दरबारी प्रभावीपणे मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. तसेच वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, आमदार किरण सामंत स्वतः फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत असल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनानेही तातडीने कामाला सुरुवात केल्याने पंचनामे आणि मदत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
यावेळी लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, तहसीलदार प्रियंका ढोले, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, राजू कुरूप, मुन्ना खामकर, बाबाशेठ भिंगार्डे, नगरसेवक वैभव जोईल, सचिन डोंगरकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

