(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे ‘शिवशंभो नमन मंडळ’ पुन्हा एकदा रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. पोलादपूर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण आणि सावर्डे येथे आपल्या कलाकृतींनी रसिकांची मनं जिंकलेल्या या मंडळाचे आता मुंबईत भव्य पदार्पण होणार आहे.
२५ नोव्हेंबर रोजी रंगमंचावर सादर होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात अवतरणार आहे एक अनोखी मामा–भाच्याची जोडी! उत्साह, विनोद आणि अप्रतिम कलागुणांचा संगम असलेल्या या सादरीकरणातून प्रेक्षकांना हास्य, संगीत आणि लोकनाट्याची मेजवानी लाभणार आहे. १७ कलावंतांच्या सहभागाने सजलेल्या या नमनात बालकलाकारांचे देखील उल्लेखनीय योगदान आहे. जितेंद्र महाडिक यांच्या सुरेल गायनाने वातावरण भारले जाते, तर गण–गौळणींचे जोशपूर्ण सादरीकरण आणि पेंद्या सुदाम यांची मिमिक्री रसिकांच्या टाळ्यांचा वर्षाव ओढवते. ‘बाळकृष्णा’च्या भूमिकेतील बालकलाकार तर रंगमंचावर विशेष उठावदार ठरत आहेत.
‘शिवशंभो नमन मंडळ’ हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून लोककलेतील परंपरा, नृत्य, संगीत आणि विनोद यांचा संगम घडवून कोकणच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे कार्यही करत आहे. मुंबईत होणारे हे सादरीकरण कोकणातील लोककलेला नवी झळाळी देईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून, रसिक प्रेक्षकांना ‘नमन’च्या या रंगोत्सवात हास्य, गाणं आणि परंपरेचा एक अविस्मरणीय अनुभव लाभणार आहे.

