(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच अवैध शस्त्रांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. सन २०२६ मध्ये जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे आणि वापरणे यासंदर्भातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवायांमध्ये आठ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत माहिती संकलन, छापेमारी आणि तपास यांचा प्रभावी वापर करण्यात आला. या कारवायांदरम्यान आरोपींकडून एकूण सात अवैध शस्त्रे आणि २९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये पाच सिंगल बॅरल काडतुसी बंदुका, एक ठासणीची बंदूक आणि एक गावठी कट्ट्याचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या सर्व कारवायांमधून एकूण दोन लाख २८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आठ आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या गुन्हेगारी हालचालींना प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवायांमुळे संभाव्य गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यात मदत झाली असून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
अवैध शस्त्रे बाळगणे, विक्री करणे किंवा त्यांचा वापर करणे याविरोधात जिल्हा पोलीस दलाने कठोर भूमिका घेतली असून, भविष्यातही अशा विशेष मोहिमा, छापे आणि प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.

