(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र तथा एनएमआयएमएस (NMIMS) सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (CDOE) येथील कायदा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. बासीम झियादत अली नेवरेकर यांना Bespoke Global Legal Summit 2026 मध्ये ‘Transformative Educator in Legal Education’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील Four Points by Sheraton हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात देशभरातील विधी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. नेवरेकर यांना Certificate of Excellence आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कायदा शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, शैक्षणिक नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात Bespoke Global Legal Summit च्या अधिकृत प्रकाशनात प्रा. बासीम नेवरेकर यांचा ‘Featured Legal Leader’ म्हणूनही विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दुहेरी दखल त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे.
संगमेश्वरच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावर मिळवलेला हा सन्मान संपूर्ण तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. प्रा. नेवरेकर यांच्या या यशामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आणि युवा संशोधकांना शिक्षण, संशोधन तसेच विधी क्षेत्रात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रा. बासीम नेवरेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संगमेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

