(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील वाटत-जांभारी फाटा परिसरात झालेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच, हा जीवघेणा साठा नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता, याचे गूढ अधिकच गडद बनले आहे. एका निष्पाप महिलेचा जीव धोक्यात घालणारा आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी थेट खेळ करणारा अज्ञात व्यक्ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी १९ मे रोजी सकाळी जांभारी फाटा परिसरातील भूत बंगल्या मागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७) यांच्या हाताला उघड्यावर पडलेल्या गावठी हातबॉम्बचा स्पर्श होताच भीषण स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. मात्र, या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब सापडणे. स्फोटानंतर जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बीडीडीएस आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान उघडकीस आलेला हा स्फोटकसाठा पाहून पोलिस यंत्रणाही हादरली. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके निर्जन भागात कोणी आणून ठेवली? त्यामागे कोणाचा हेतू होता? या स्फोटकांचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी होणार होता? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, इतक्या धोकादायक वस्तू उघड्यावर पडून असताना स्थानिकांच्या जीविताला किती मोठा धोका निर्माण झाला होता, याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५ (ब), २८८ तसेच भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले सर्व २९ जिवंत हातबॉम्ब सुरक्षितरीत्या निकामी केले.
दरम्यान, स्फोटकांचा साठा ठेवणारा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. ग्रामीण आणि निर्जन भागात इतक्या सहजपणे स्फोटके आणून ठेवली जात असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा तपास आता केवळ अपघाती स्फोटापुरता मर्यादित राहिलेला नसून, त्यामागील संभाव्य गुन्हेगारी जाळे आणि स्फोटकसाठ्याच्या मूळ स्रोताचा शोध घेणे, हे पोलिसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.

