(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व महसूल विभागाच्या नावे हस्तांतरित करून शासनाच्या ताब्यात घेण्याची मागणी पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रवीण पोळेकर यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२९ मे २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात गोपाळगड हा शिवकालीन ऐतिहासिक किल्ला असून त्याच्या काही भागांवर खाजगी मालकी हक्क असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, सदर या किल्ला क्षेत्रात स्थानिकांची वहिवाट व आंबा बागायती आहेत. याबाबत गेले अनेक वर्ष सदरची मालकी हटविण्यासाठी येथील स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी मंडळी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक मिडिया शासन स्तरावर प्रयत्न करीत असताना याबाबतच्या कायदेशीर बाबी बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या असून आत्ता पुरातत्व विभाग व महसूल विभाग यांनी अंतिम टप्प्यातली कार्यवाही करून प्रत्यक्षात किल्ला शासनाच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
गोपाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तो पूर्णपणे शासनाच्या ताब्यात आणून खाजगी मालकीतील वादग्रस्त भाग मुक्त करावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या निवेदनाबाबत बोलताना, सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने काही बंधने आहेत, त्यामुळे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आचारसंहिता संपताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून गोपाळगड शासनाच्या ताब्यात घेण्याविषयी कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.
गोपाळगड किल्ला हा गुहागर तालुक्याच्या ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या वारशांपैकी एक मानला जातो. त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

