(गुहागर)
बाजारात जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या वृद्धेचा २७ दिवसांनी गुहागरातील कुंडली मोडा येथील खाडीत मृतदेह सापडला. रंजना बाळासोा थोरात (वय ७३, रा. जाकादेवी, रत्नागिरी) असे वृद्धेचे नाव आहे. खाडीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रंजना थोरात या १ सप्टेंबर रोजी सकाळी जाकादेवी बाजारपेठेत जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परत आल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा शोध लागला नाही. त्यांचा शोध सुरू असतानाच २७ सप्टेंबर रोजी दुपारी गुहागर तालुक्यातील कुंडली माडा येथील खाडीतील पाण्यात त्या मृतावस्थेत आढळल्या. या प्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.