(रत्नागिरी / वार्ताहर)
अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (बुधवारी) रत्नागिरी शहरात आंदोलन करण्यात आले. राम आळी परिसरातील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. ही महाआरती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मुख्य महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील चोरीची घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. ही घटना केवळ सुरक्षेतील त्रुटी नसून कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने श्रीराम मंदिराची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान “जय श्रीराम”च्या घोषणांसह निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महाआरतीनंतर उपस्थितांनी चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. महिला आघाडी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांचाही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता.
या आंदोलनामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरणात या विषयाची चर्चा रंगली असून, अयोध्या येथील चोरीच्या प्रकरणावर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

