(संगमेश्वर / एजाज पटेल)
पावसाळ्यापूर्वी घर सुरक्षित राहावे, यासाठी घेतलेली काळजीच एका कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःख ठरली. संगमेश्वर तालुक्यातील धामणाकवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातात ५२ वर्षीय दिलीप बाळ्या धामणाक यांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
२६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दिलीप धामणाक हे आपल्या घराच्या छपरावर आलेली आंब्याच्या झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले होते. पावसाळ्यात ही फांदी घरासाठी धोकादायक ठरू शकते, म्हणून ती हटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, काम सुरू असतानाच अचानक त्यांचा तोल गेला आणि ते उंचावरून थेट जमिनीवर कोसळले.
हा अपघात अत्यंत भीषण होता. पडल्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिलीप यांना पाहताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली. त्यांना तातडीने संगमेश्वर येथील डॉ. दौड यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी त्यांना चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. डेरवण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप धामणाक यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही बातमी समजताच नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घराचा कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी २९ मे रोजी रात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २१/२०२६ अंतर्गत बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. घर आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या दिलीप धामणाक यांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने धामणाकवाडीसह संपूर्ण कडवई परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

