(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिला जाणारा प्रसिद्ध लाडूप्रसाद सध्या बंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण-इस्रायल या देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका आता देवस्थान व्यवस्थेलाही बसू लागला आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशभरात गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम गणपतीपुळे येथील मंदिरातील प्रसाद व्यवस्थेवरही झाला असून लाडू प्रसाद तयार करण्यासाठी लागणाऱ्या गॅसच्या तुटवड्यामुळे हा प्रसाद तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच असल्याने मंदिरात दुपारच्या सत्रात भाविकांना दिला जाणारा खिचडी प्रसाद आणि सायंकाळी देण्यात येणारा पुलाव भात देखील इंधन संपताच बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ श्रींचे दर्शन घेऊनच परतावे लागणार असून अनेक भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
देवस्थान समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यवस्था तात्पुरती असून गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे लाडू प्रसाद सुरू करण्यात येणार आहे. तरी सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थान समितीला भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले असून तशाप्रकारे देवस्थान समितीने गणपती मंदिरातील मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी सुचनाफलक लावले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम मात्र थेट धार्मिक स्थळांवरही जाणवू लागल्याने भाविकांमध्ये आता चिंता व्यक्त होत आहे.

