(संगमेश्वर / एजाज पटेल)
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या फुणगूस खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अखेर सक्रिय झाली आहे. कोंडये, मांजरे, मेढे, डावखोल आणि डिंगणी परिसरातील आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून अहवाल तालुका स्तरावर सादर केला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोंडये गावचे सरपंच तथा शिवसेना कसबा गट विभाग प्रमुख महेश देसाई यांनी तातडीने पुढाकार घेतला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महसूल व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
त्यानुसार महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी बाधित गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पाहणी केली. वादळी वाऱ्यामुळे झालेली फळगळ, तुटलेली फांदी तसेच उन्मळून पडलेली झाडे यांची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन पंचनामे पूर्ण करण्यात आले. हे सर्व काम युद्धपातळीवर पूर्ण करून संबंधित अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता नुकसानग्रस्त बागायतदारांचे लक्ष शासनाच्या आर्थिक मदतीकडे लागले आहे.
अहवाल तालुका स्तरावर सादर झाल्यामुळे मदत प्रस्तावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शासनाकडून मदत कधी जाहीर होणार आणि ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात केव्हा पडणार, याकडे संपूर्ण खाडीपट्ट्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त बागायतदारांना जास्तीत जास्त आणि तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली.

