(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून, सन २०२६ मध्ये अमली पदार्थांविरोधातील कारवाईत तब्बल १७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये २७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ब्राऊन हेरॉईन, गांजा आणि इतर अमली पदार्थांसह तब्बल ६ लाख ६४ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ मे २०२५ पासून ‘मिशन फिनिक्स’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थांच्या सेवन, विक्री आणि तस्करीविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्वीकारत पोलीस दलाने जिल्हाभर कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ गुन्हे दाखल करण्यापुरती मर्यादित नसून युवकांना व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढणे, समाजात जनजागृती निर्माण करणे आणि ‘अमली पदार्थमुक्त रत्नागिरी’ घडविणे हा त्यामागील व्यापक उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सन २०२६ मधील कारवायांमध्ये अमली पदार्थ सेवनाच्या ८ तर बेकायदेशीर ताबा व विक्रीसंदर्भातील ९ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरित्या छापेमारी, गोपनीय तपास आणि सातत्यपूर्ण कारवायांच्या माध्यमातून ही प्रकरणे उघडकीस आणली. अमली पदार्थांच्या बेकायदेशीर पुरवठा साखळीवर प्रभावी प्रहार करण्यासाठी जिल्ह्यातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, संशयित हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजव्यवस्था निरोगी राखण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

