(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यात दोन समाजातील अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे तीव्र पडसाद उमटत शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरत रस्त्यावर टायर जाळले, घोषणाबाजी केली आणि कायदा हातात घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी दोन स्वतंत्र जमावांतील १६ प्रमुख संशयितांसह सुमारे ५०० हून अधिक अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस शिपाई उदय केशव टेमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, २७ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून २८ मेच्या पहाटेपर्यंत हा संपूर्ण घटनाक्रम सुरू होता. याप्रकरणी २८ मे रोजी सायंकाळी ४.४२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात दोन समाजातील मुलांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सायंकाळी साडेसातच्या सुमारास हर्णे बायपासवरील निसर्ग हॉटेलजवळ मोठा जमाव एकत्र आला. जमावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत रस्त्यावर टायर जाळले तसेच महामार्गावरील वाहतूक रोखून धरत प्रवाशांची गैरसोय केली.
दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात आणखी मोठा जमाव एकत्र आला. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत घोषणाबाजी करण्यात आली. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, काही काळ शहरातील जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या दोन्ही घटनांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९०, १२६(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दापोली शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या घटनांमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सार्वजनिक शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणालाही कायद्यापासून सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
घटनेकडे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे बारकाईने लक्ष
या घडलेल्या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तत्काळ २७ मेच्या मध्यरात्री दापोलीत दाखल होत घटनास्थळाचा आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस यंत्रणेशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त, संशयितांवर देखरेख आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे स्वतः संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक हालचालीवर सतत नजर ठेवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन
दापोलीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, तसेच भावना भडकावणाऱ्या कृतींपासून दूर राहावे, कोणतीही संशयास्पद हालचाल, तक्रार अथवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ डायल 112, ‘रत्नसेतू’ चॅटबॉट (9371415612) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

