(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे संगमेश्वरातील सोनवी चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. आज (शुक्रवारी) या भीषण कोंडीत चक्क ‘१०८’ रुग्णवाहिका अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. कुरधुंडा येथील गंभीर रुग्णाला आणण्यासाठी निघालेली ही रुग्णवाहिका वाहतुकीत अडकल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोनवी चौकातील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून ठिकठिकाणी खड्डे, राडारोडा आणि अरुंद मार्गामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतानाही संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आज सायंकाळी वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाल्याने रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळू शकला नाही. सायरन वाजवत रुग्णवाहिका पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि वाहनांच्या रांगांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. या घटनेनंतर “महामार्गाचे रखडलेले काम आता नागरिकांच्या जीवाशी खेळू लागले आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पोलिसांची धावपळ, ठेकेदारावर नागरिकांचा रोष
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि त्यांचे पथक तसेच महामार्ग पोलीस सतत प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र संबंधित कंत्राटदार कंपनीकडून अपेक्षित गतीने काम होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रुग्णवाहिकेला वेळेत मार्ग मिळत नसेल, तर या विकासकामाचा नेमका फायदा काय? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
तातडीने कारवाईची मागणी
सोनवी चौकातील वाहतूक समस्येमुळे नागरिकांचा संयम सुटत चालला असून रखडलेल्या कामाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशाच परिस्थितीत एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामार्ग प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी तसेच रखडलेल्या कामाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी संगमेश्वरकरांकडून केली जात आहे.

