(संगमेश्वर / प्रतिनिधी)
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ देवरुख येथे सकल हिंदू समाजातर्फे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एका मुस्लिम युवकाने हिंदू समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची बातमी समोर आली होती. या प्रकारानंतर काही वाद निर्माण झाले असून, यासंदर्भात विविध आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत.
यावर उबाठा तालुका प्रमुख नंदादिप उर्फ बंड्या बोरुकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “देवरुख हे हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ओळखले जाते. एका तरुणाच्या कथित वक्तव्याचा विपर्यास होऊन गावातील शांतता बिघडू नये, यासाठी आम्ही संबंधित तरुणाच्या घरी गेलो. आम्ही त्याचे म्हणणे ऐकले आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनाही सुसंवादातून समजावले. वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.”
ते पुढे म्हणाले, “देशविरोधी विचारांना आमचा विरोध आहेच. पण प्रत्येक घटनेकडे धार्मिक दृष्टीने बघणे योग्य नाही. आम्हीही हिंदू असून, काश्मीरमधील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.”
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सध्या गावात कोणताही तणाव नाही. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.