(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावात घराच्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर तोडगा निघाला असून, संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने संबंधित घराच्या चाव्या महिलेच्या ताब्यात देण्यात आल्या. यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे.
घराच्या ताब्याबाबतचा वाद उफाळून आल्यानंतर पोलिसांनी यापूर्वीच संबंधित पक्षांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांनंतरही घराचा ताबा हस्तांतरित करण्यात विलंब होत असल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. मिळालेल्या माहितीनुसार, शिवणे येथील रहिवासी स्मिता जुवेकर यांच्या कुटुंबाशी संबंधित या प्रकरणामागे काही वर्षांपूर्वी झालेल्या आर्थिक व्यवहारांची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. जुवेकर यांच्या भावाने सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जासाठी गावचे पोलिस पाटील मनोज शिंदे यांनी जामीनदार म्हणून भूमिका बजावली होती. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर कर्ज आणि आर्थिक दायित्वांशी संबंधित वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर घराच्या ताब्याचा प्रश्न गुंतागुंतीचा बनल्याचे सांगितले जात आहे.
प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत मध्यस्थीची भूमिका पार पाडली. त्यांच्या उपस्थितीत चर्चा घडवून आणण्यात आली आणि अखेर संबंधित महिलेला घराचा ताबा तसेच घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहार, कर्जाची परतफेड, जामीनदाराची जबाबदारी आणि इतर कायदेशीर पैलू याबाबत पुढील स्तरावर स्वतंत्र चौकशी अथवा कायदेशीर प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वादग्रस्त प्रश्न शांततापूर्ण मार्गाने निकाली निघाल्याची भावना व्यक्त होत असून, स्थानिक नागरिकांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे. कायदेशीर चौकटीत राहून वाद सोडविण्याचा मार्ग स्वीकारल्यास सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यास मदत होते, असे मतही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

