(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर बसस्थानकातील डिजिटल माहिती फलकांचा वापर प्रवाशांना बसफेऱ्यांची माहिती देण्याऐवजी प्रामुख्याने जाहिराती दाखविण्यासाठी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे बसचे मार्ग, फलाट आणि वेळापत्रकाची माहिती न मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, याबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांना बसफेऱ्यांची अचूक माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संगमेश्वर बसस्थानकात डिजिटल माहिती फलक बसविण्यात आले होते. मात्र, सध्या या स्क्रीनवर बसच्या आगमन-विर्गमनाची माहिती न दाखवता बहुतांश वेळ जाहिरातीच प्रसारित होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना बसची वेळ, मार्ग आणि फलाट याबाबत चौकशी खिडकीवर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रार आहे.
शेजारील देवरुख बसस्थानकात डिजिटल फलकांवर बसचे वेळापत्रक, मार्ग आणि क्रमांक नियमितपणे प्रदर्शित केले जात असल्याने तेथील प्रवाशांना मोठी सुविधा मिळत आहे. मात्र, संगमेश्वर बसस्थानकात अशी व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत नसल्याने प्रवाशांना अनावश्यक धावपळ करावी लागत आहे.
याशिवाय, स्क्रीनवर सुरू असलेल्या जाहिरातींचा आवाज अत्यंत मोठा असल्याने बसस्थानकातील वातावरण त्रासदायक बनत असल्याची तक्रारही प्रवाशांनी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आजारी प्रवाशांना याचा अधिक त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.
डिजिटल माहिती फलकांचा प्राथमिक उद्देश प्रवाशांना अचूक व तात्काळ माहिती उपलब्ध करून देणे हा असून, त्यावर बसचे थेट वेळापत्रक, मार्ग आणि फलाट क्रमांक नियमितपणे प्रदर्शित करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर, संगमेश्वर बसस्थानकातील डिजिटल फलकांवरील बस वेळापत्रक तातडीने सुरू करावे, जाहिरातींचा आवाज नियंत्रित करावा आणि प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी संगमेश्वर तालुका भाजपचे उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी केली आहे. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास प्रवाशांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

