(साखरपा / वार्ताहर)
रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता एक मोठा अपघात घडला. खाजगी प्रवासी बस सुमारे ७० फूट दरीत कोसळून ३७ प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेतली तर १ वर्षाच्या बालकाचा झालेला चमत्कारिक बचाव सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. प्रत्यक्षदर्शी सांगतात, “देव तारी त्याला कोण मारी” याची प्रचितीच आंबा घाटात प्रत्यक्ष मिळाली.
नेपाळ येथून ११० प्रवाशी घेऊन ही बस सोमवारी निघाली होती. पहाटे ४.३० च्या सुमारास बस आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले. बसने संरक्षक कठडा तोडला आणि ती थेट दरीत कोसळली. रात्रीच्या अंधारात धडक बसताच बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. किंकाळ्या, अंधार आणि या यामुळे परिस्थिती भयावह बनली.
याचदरम्यान, रत्नागिरीचे शिवराज कलामंचचे प्रमुख शेखर पांचाळ आणि त्यांचे सहकारी कलाकार जवळून जात होते. दत्तजयंतीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या या ताफ्याने तुटलेला कठडा आणि दरीत कोसळलेली बस पाहताच तत्काळ कार्यवाही सुरू केली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली, ऍम्ब्युलन्स बोलावली आणि स्थानिक पोलिसांसह प्रवाशांना वर काढण्यास मदत केली. त्यांच्या या तातडीच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे जीव वाचले.
अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये एका दांपत्यासह त्यांचा १ वर्षाचा मुलगादेखील होता. भीषण अपघातात बस दरीत कोसळून पलटी होऊनही हे तिघेही चमत्कारिकरीत्या बचावले. बस दरीत जाताना एका आंब्याच्या झाडाला धडकली, झाड मध्यावर मोडले आणि त्यानंतर बस आणखी खाली कोसळली. इतक्या मोठ्या अपघातातूनही आपले बाळ सुरक्षित राहिल्याने दांपत्य भावूक झाले होते. “फक्त दैव बलवत्तर म्हणून आमचे बाळ वाचले” असे त्यांनी सांगत देवाचे आभार मानले.
प्रशासन, स्थानिक कलाकार आणि पोलिसांच्या मदतीमुळे सकाळी बचावकार्य वेगाने पार पडले. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस व साखरपा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीतून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

