(संगमेश्वर / एजाज पटेल )
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलच्या पाठीमागील डोंगराचा काही भाग कोसळल्याने शाळेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. सुमारे ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी धोकादायक ठरलेल्या सहा वर्गखोल्या त्वरित रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी आनंद लोकरे, शिक्षण विस्तार अधिकारी त्रिभुवने तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान दरड कोसळल्यामुळे शाळेच्या परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
शौचालयाचे मोठे नुकसान
दरड कोसळल्याच्या तडाख्यात शाळेचे शौचालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी विद्यार्थी त्या परिसरात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमागे उत्खनन किंवा संबंधित कामातील निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची प्राथमिक चर्चा असून, याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
दरडग्रस्त भागालगत असलेल्या सहा वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी या वर्गखोल्या तातडीने रिकाम्या करून विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देश सभापती शर्वरी वेल्ये यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
दोषींवर कारवाईची मागणी
या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी येत्या शनिवारी (११ जुलै) कोळंबे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शाळेचे झालेले नुकसान भरून काढण्याबरोबरच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत,” असे सभापती शर्वरी वेल्ये यांनी सांगितले.

