( मुंबई )
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदू बाबा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीविरोधात मोठी कारवाई सुरू झाली आहे. अवघ्या सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील 50 भोंदू बाबांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह ॲड. रंजना गवांदे, सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी ही माहिती दिली. राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी राज्यभरातील गुन्ह्यांची यादी संकलित केली आहे.
महिलांच्या शोषणाची धक्कादायक प्रकरणे
समितीने दिलेल्या माहितीनुसार, नोंदविण्यात आलेल्या बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक छळ झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही भोंदू बाबांनी अनेकांना जाळ्यात ओढल्याचे तपासातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक पीडित महिला सामाजिक बदनामी आणि भीतीमुळे तक्रार करण्यास पुढे येत नव्हत्या. मात्र अशोक खरात प्रकरणानंतर पीडितांमध्ये न्यायासाठी लढण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे.
नाशिक जिल्हा सर्वाधिक चर्चेत
राज्यात दाखल झालेल्या 50 गुन्ह्यांपैकी सर्वाधिक पाच प्रकरणे नाशिक जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहेत. अशोक खरात, विठोबा वाल्मीक जाट, महेशगिरी उर्फ महेश काकडे, चंद्रकांत माळी आणि कमलेश महाराज अधिकारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्व धर्मांतील भोंदूंवर कारवाई
या यादीत हिंदू, मुस्लिम तसेच इतर धर्मांशी संबंधित व्यक्तींवरही गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून अंधश्रद्धा आणि फसवणूक करणाऱ्या प्रत्येकाविरोधात असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
आर्थिक लूट आणि लैंगिक शोषणाचे वाढते प्रमाण
राज्यभरातील घटनांचा आढावा घेतल्यास महिलांचे लैंगिक शोषण, उपचारांच्या नावाखाली फसवणूक, चमत्कारांचे आमिष, भूतबाधा घालवण्याचे दावे आणि आर्थिक लूट अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागरिकांना अशा भोंदू व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, फसवणूक किंवा शोषण झाल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरातील 50 भोंदूंवर गुन्हे
नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सोलापूर, अकोला, धुळे, नांदेड, यवतमाळ, नागपूर, सांगली, चंद्रपूर, संभाजीनगर, पालघर, ठाणे आणि अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भोंदू बाबा, बुवाबाजी करणारे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे गुन्हे जादूटोणा विरोधी कायदा किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे:
१) अशोक कुमार खरात, नाशिक
२)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर, अहिल्यानगर
३) चेतन सुनील माळी, मूर्तिजापूर, अकोला
४) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे
५)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी, सोलापूर
६)नाना बर्डे , आळे फाटा, पुणे
७) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई
८) अल्ताफ रईस खान, मालाड, मुंबई
९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई
१०) गणेश शिंदे, श्रीरामपुर, अहिल्यानगर
११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा, नवी मुंबई
१२)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
१३)किसन तळपे मंदोशी, खेड
१४ ) महेशगिरी उर्फ महेश काकडे, लासलगाव ,नाशिक
१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड
१६) इरफान नियाज अहमद, कांदिवली , मुंबई
१७) अनिल सोलोमन सिंग (पादरी), पुणे
१८)शिवराम पराश सावर, पालघर
१९)अल्ताफ हसन मदारी, जळगाव
२०)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी, सोलापूर
२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे
२२) हेमदास किसन बावणे, अड्याळ, भंडारा
२३) चंद्रकांत राजेंद्र माळी, इगतपुरी, नाशिक
२४) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर
२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे
२६)नवनाथ गवळी, खेड, पुणे
२७) शाहिद शेख, खडकपाडा, कल्याण
२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर
२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड
३०) रमेश गुप्ता, मालाड, मुंबई
३१)हरिगिरी दत्तगिरी महाराज, भाग्यनगर, नांदेड
३२) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित, ठाणे
३३) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे
३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर
३५) श्याम महाराज राठोड, दिघी, पुणे
३६) सुधाकर गाडगे, बाळापूर, अकोला
३७) परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे
३८) शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ, पुणे
३९) योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार, निजामपूर, साक्री, धुळे
४०) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ
४१) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर
४२) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती
४३) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल) , यवतमाळ
४४)महेश मोहन बाबर, विटा, सांगली
४५) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक
४६)परवेज अब्दुल अजीज मेमन, कोंढवा, पुणे
४७) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर
४८) भीमराव पुंजाराम बिहाडे, संभाजीनगर
४९) मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज, कन्नड, संभाजीनगर
५०) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.
या कारवाईमुळे राज्यात अंधश्रद्धा आणि बुवाबाजीविरोधातील लढ्याला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

