(मुंबई)
म्हाडा (MHADA) फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ महिलेची तब्बल 60 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे. जतीन बाबू सोलंकी असे आरोपीचे नाव असून तो मंत्रालयातील महसूल विभागात कर्मचारी असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांना गंडा घालत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 69 वर्षीय महिला मालाड परिसरात राहतात. आरोपी जतीन सोलंकी हा त्यांचा जुना परिचित असून दोघांची ओळख तब्बल 23 वर्षांपासून होती. या विश्वासाचाच फायदा घेत आरोपीने महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
MHADA फ्लॅटचे आमिष दाखवून विश्वास संपादन
एप्रिल 2025 मध्ये आरोपी जतीन सोलंकी महिलेच्या संपर्कात आला. त्यावेळी त्याने स्वतःला मंत्रालयातील महसूल विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच म्हाडाशी संबंधित कामे आपल्या माध्यमातून होत असल्याचा दावा केला. महिलेच्या कुर्ला पाइपलाइन परिसरातील तीन झोपड्या पुरात वाहून गेल्याची माहिती आरोपीला होती. त्याच पार्श्वभूमीवर तीन पुनर्वसन फ्लॅट आणि अतिरिक्त दोन फ्लॅट स्वस्त दरात मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपीने गोरेगाव येथील सिग्मा टॉवरमधील काही फ्लॅटही दाखविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
60 लाखांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप
फ्लॅट मिळणार या विश्वासातून महिलेने आरोपीला 15 लाख रुपये रोख दिले. त्याशिवाय विविध व्यवहारांद्वारे 47 लाख 47 हजार रुपये बँक खात्यात वर्ग केले. अशा प्रकारे आरोपीने एकूण 60 लाख 47 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये फ्लॅटचे अलॉटमेंट पत्र देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला एमएमआरडीए कार्यालयाजवळ बोलावले होते. मात्र मंत्रालयातील महत्त्वाची फाईल चोरीला गेल्याचे कारण सांगून तो तेथे पोहोचलाच नाही. त्यानंतर आरोपी सतत वेगवेगळी कारणे देत महिलेचा संपर्क टाळत होता.
तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणूक आणि अपहाराचे गुन्हे नोंदवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दीड महिना फरार असलेल्या जतीन सोलंकीला पोलिसांनी 27 मे रोजी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी फसवणुकींचा संशय
प्राथमिक चौकशीत आरोपी मंत्रालयातील कर्मचारी असल्याची खोटी ओळख वापरत असल्याचे समोर आले आहे. त्याने अशाच प्रकारे इतर नागरिकांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या दृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे MHADA फ्लॅट, सरकारी नोकरी किंवा मंत्रालयातील ओळखीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या आश्वासनांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे

