(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार समान किमान कार्यक्रमांतर्गत येथील गोदुताई जांभेकर विद्यालयात विधी सेवा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, महिलांची सुरक्षितता, मुलांसाठीचा पोक्सो कायदा-२०१२ तसेच रस्ता सुरक्षा या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव आर. आर. पाटील तसेच दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती एच. आर. जाधव उपस्थित होत्या. त्यांनी विविध कायदेविषयक बाबी विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत उलगडून सांगितल्या.
यावेळी नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी (NALSA) अंतर्गत मुलांसाठी उपलब्ध असलेल्या बाल-अनुकूल कायदेशीर सेवा, पोक्सो कायदा-२०१२ अंतर्गत मुलांचे संरक्षण आणि नालसा हेल्पलाईन क्रमांक १५१०० याबाबत सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक श्रीकांत जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या महत्त्वपूर्ण कायदेविषयक मार्गदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

