(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जुलै महिन्याच्या प्रारंभी मुसळधार कोसळलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण करत जनजीवन विस्कळीत केले होते. नद्या-नाले दुथडी भरून वाहत होते, तर अनेक सखल भाग जलमय झाले होते. या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आणि भातलावणीच्या कामांनी वेग घेतला. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. ऐन भातलावणीच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील कामांवर विपरीत परिणाम होऊ लागला असून, बळीराजाची धास्ती पुन्हा वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर कडक ऊन पडत असून, अधूनमधून केवळ एखादी हलकी सर कोसळत आहे. त्यामुळे शेतांमध्ये साचलेले पाणी झपाट्याने आटत आहे. अनेक ठिकाणी चिखलाचा आवश्यक ओलावा कमी झाल्याने भातलावणीची कामे मंदावली आहेत. काही भागांत शेतकरी पंपाच्या साहाय्याने पाणी शेतात सोडून लावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही व्यवस्था सर्वांसाठी शक्य नसल्याने अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला चांगली हजेरी लावली असली, तरी त्यानंतरचा खंड शेतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास भात रोपांची वाढ खुंटण्याची तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसाच्या प्रत्येक सरीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
१ जून ते १३ जुलै या कालावधीत जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची स्थिती काहीशी समाधानकारक असली, तरी दीर्घकालीन वार्षिक सरासरीच्या तुलनेत अद्यापही पावसाची मोठी तूट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या अवघ्या ४० टक्के पावसाचीच नोंद झाली आहे. खेड, चिपळूण, दापोली आणि राजापूर तालुक्यांत जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, मागील ४८ तासांत संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असून, अनेक भागांत केवळ १ ते २ टक्के इतक्याच पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. मात्र, १७ जुलैपासून कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी लागण्याची आशा व्यक्त केली जात असली, तरी सातत्यपूर्ण आणि समाधानकारक पावसाचीच खरी गरज असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून, वेळेत दमदार पाऊस न झाल्यास भातलावणी उशिरा पूर्ण होण्याबरोबरच आगामी खरीप हंगामावरही त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांतील पावसाची स्थिती जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

