(सातारा)
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज प्रथमच कराड दौऱ्यावर येत आहेत. प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या कराड येथील प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन नतमस्तक होणार आहेत. पवार कुटुंबासाठी प्रीतिसंगम हे नेहमीच ऊर्जा आणि प्रेरणास्थान राहिले असून, सुनेत्रा पवार यांची ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
या दौऱ्यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या प्रीतिसंगमाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र एका प्रभावी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असली, तरी उपमुख्यमंत्री पदाची शान वाढवणाऱ्या अजित पवार यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
यशवंत विचारांच्या मुशीत आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार यांचे नेतृत्व घडले. त्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आणि अर्थमंत्री म्हणून विधिमंडळात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला. झपाट्याने काम करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी ते प्रीतिसंगमावर आवर्जून उपस्थित राहत असत.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार या बारामतीहून थेट प्रीतिसंगमावर येणार आहेत. त्यानंतर त्या कराडहून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाणार असून, विमान अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

