(रायगड / खोपोली)
खालापूर तालुक्यातील चावणी परिसरात वन खात्याच्या ताब्यातील झाडांची अवैधरित्या तोड करून खैर जातीच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या टोळीला वनविभागाच्या सतर्क कारवाईत गजाआड करण्यात आले. या धाडसी कारवाईत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिकअप जीप व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सोमवारी (दि. १५) मध्यरात्री उंबर परिमंडळातील चावणी परिसरात खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास अधिकारी वनपाल सुभाष राठोड, वनपाल भगवान दळवी, वनपाल संजय पगारे, अतुल ओव्हाळ, वनरक्षक मयूर निकम, नितीन कराडे, अंकुश केंद्रे, चंदन नागरगोजे, पांडु घुटे, गौरक्ष दहिफळे, बालाजी सुर्यवंशी, महेश माने आणि राजाराम पारथी यांच्या पथकाने पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई केली. त्या वेळी एक पिकअप टेम्पो येऊन आधीच तोडून ठेवलेले खैर जातीचे ओंडके भरत असताना पथकाने पकडले. अंधाराचा फायदा घेत काही आरोपी पसार झाले. मात्र चालक रुपेश विनायक पवार (३४, रा. कुडवळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेतल्यावर टेम्पोत मौल्यवान खैर लाकूड आढळून आले. वाहनासह पंचनामा करून ते साजगाव शासकीय डेपोवर जमा करण्यात आले.
मंडणगड येथे ठेवलेला खैर माल जप्त
या प्रकरणी पुढील चौकशीत रत्नागिरी जिल्ह्यातीलच आरोपी राम शिवाजी पवार, किरण हरिश्चंद्र पवार, रोहित दीपक जाधव आणि ऋतिक शशिकांत पवार (सर्व रा. कुडवळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांना पाली-वाकण परिसरातून जेरबंद करण्यात आले. चौकशीत या सर्वांनी यापूर्वीही विविध राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या खैर वृक्षतोड करून तस्करी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मंडणगड येथे ठेवलेला १४ घ. मी. खैर माल जप्त करून दापोली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक सागर माळी (पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

