( नागपूर )
राज्यात सिगारेट आणि ई-सिगारेट (व्हेपिंग)च्या वाढत्या व्यसनावर चिंता व्यक्त केली जात असतानाच, पालकांना हादरवणारी गंभीर घटना नागपुरात उघडकीस आली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेत सहावीतील अल्पवयीन विद्यार्थ्याला कोचिंग क्लासच्या व्हॅनचालकाने थेट ई-सिगारेटच्या व्यसनाच्या नादी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वरुण सोनी (वय 24, रा. पोलीस लाईन टाकळी) असे आरोपी व्हॅनचालकाचे नाव असून तो एका कोचिंग क्लास अकॅडमीसाठी व्हॅन चालवतो. पोलिस विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या 12 वर्षीय मुलाशी त्याची ओळख झाली होती. स्वतः ई-सिगारेटचे व्यसन असलेल्या वरुणने विद्यार्थ्याला एकटे गाठत फ्लेव्हर्ड व्हेप ओढण्यास प्रवृत्त केले.
फ्लेव्हर्ड ई-सिगारेटमुळे नवलाई वाटल्याने विद्यार्थ्याने अनेक वेळा व्हेपिंग केले. नंतर वरुणने “तुला अशीच ई-सिगारेट हवी असेल तर 500 रुपये लागतील” असे सांगितले. विद्यार्थ्याने आईच्या पर्समधून पैसे काढून आरोपीला दिले आणि त्यानंतर त्याला नियमित व्यसन लागले.
या व्यसनाचा थेट परिणाम मुलाच्या आरोग्यावर झाला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्याला चक्कर येऊन हातपाय कडक होण्याचा प्रकार घडला. त्यावेळी आरोपीने केवळ आईला फोन करून मुलाला घेऊन जाण्यास सांगितले, मात्र ई-सिगारेटबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
काही दिवसांनी शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थी ई-सिगारेट ओढताना सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. यानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रकार समजला आणि पालकांना तातडीने शाळेत बोलावण्यात आले. चौकशीत विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार उघड केला, ज्यामुळे पालकांना मोठा धक्का बसला.
आरोपी इतर विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करत होता
चौकशीत आरोपी वरुण सोनी आणखी काही विद्यार्थ्यांना ई-सिगारेटची सवय लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. एका विद्यार्थ्याकडे त्याने थेट पैशांची मागणी केल्याचेही निष्पन्न झाले. शाळेत बोलावल्यावर आरोपीने अखेर सर्व प्रकार कबूल केला.
विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम (COTPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून शाळा आणि वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

