(रत्नागिरी / प्रतिनिधी)
डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना त्याच वेगाने सायबर गुन्हेगारांचे जाळेही विस्तारत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी अवघ्या सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील ७४३ नागरिकांची फसवणूक करत तब्बल ७ कोटी ९२ लाख ७३ हजार ६३६ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आयुष्यभराची बचत बँकेत सुरक्षित असल्याचा विश्वास बाळगणारे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक या फसवणुकीचे सर्वाधिक बळी ठरत आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी दिवसागणिक नव्या युक्त्या वापरल्या जात आहेत. वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी, बँकेचे केवायसी अद्ययावत न केल्यास खाते बंद होणार असल्याचे संदेश, पॅनकार्ड अथवा सिमकार्ड ब्लॉक झाल्याची खोटी सूचना, ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा पार्टटाईम नोकरीच्या नावाखाली भरघोस कमाईचे आमिष, लॉटरी लागल्याचे खोटे दावे, स्वस्त दरात वस्तू मिळण्याचे प्रलोभन अशा विविध माध्यमांतून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. अलीकडे तर जनगणनेच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून वैयक्तिक माहिती आणि बँकिंग तपशील मिळवण्याचा नवा फंडाही या भामट्यांनी अवलंबल्याचे निदर्शनास आले आहे.
फसवणुकीच्या वाढत्या घटनांदरम्यान पोलिसांनी वेगाने कारवाई करत १ कोटी ५९ लाख ७९ हजार ७३२ रुपये गोठविण्यात यश मिळविले आहे. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ ७ लाख ७६ हजार ५१८ रुपये संबंधित तक्रारदारांना प्रत्यक्ष परत मिळाले आहेत.सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतरची पहिली दोन तासांची वेळ ‘गोल्डन अवर’ मानली जाते. अनेक नागरिक भीती, संकोच किंवा माहितीअभावी तातडीने तक्रार नोंदवत नाहीत. या विलंबाचा फायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमध्ये वळवतात. परिणामी ती रक्कम परत मिळविण्याचे आव्हान अधिक कठीण बनते. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहणे, कोणत्याही अनोळखी लिंक किंवा आमिषांना बळी न पडणे हीच प्रभावी खबरदारी ठरणार आहे.
गोठवलेली रक्कम परत मिळविण्याची प्रक्रिया क्लिष्ट
सायबर फसवणुकीत गोठवलेली रक्कम परत मिळविण्यासाठी न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पोलिसांचे अंतिम ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, न्यायालयाचा आदेश आणि बँकेकडून खात्याची सखोल पडताळणी झाल्यानंतरच संबंधित रक्कम परत केली जाते. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये पीडितांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते.
फसवणूक टाळण्यासाठी या बाबी लक्षात ठेवा
– कोणालाही फोनवर ओटीपी, एटीएम पिन, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती देऊ नका.
– संशयास्पद लिंक, लॉटरी किंवा बक्षिसांच्या संदेशांवर क्लिक करणे टाळा.
– बँक खाते, पॅनकार्ड किंवा सिमकार्ड ब्लॉक झाल्याचा संदेश आल्यास संबंधित संस्थेशी थेट संपर्क साधून खातरजमा करा.
– फसवणूक झाल्याची शंका येताच दोन तासांच्या आत १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तातडीने तक्रार नोंदवा.

