( रायगड )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव परिसरात भरधाव फॉर्च्युनर कारच्या धडकेत वाहतूक पोलिसासह तिघेजण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार चालकाला पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी थरारक पाठलाग करून अखेर ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, ढालघर परिसरात संबंधित फॉर्च्युनर चालक अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत होता. यावेळी त्याने दोन पादचाऱ्यांना धडक देण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक नागरिक सतर्क झाले. चालकाचा वाढता वेग आणि निष्काळजीपणा पाहून ग्रामस्थांनी कारचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांना पाहूनही गाडी न थांबवता धडक
ग्रामस्थ पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनाचा वेग आणखी वाढवला. दरम्यान, माणगाव-मोर्बा मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आणि काही नागरिकांनी बॅरिकेड्स लावून कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन थांबवण्याऐवजी थेट समोर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाला आणि दोन ग्रामस्थांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही जखमी झाले. त्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न करत होता.
फिल्मी स्टाईल पाठलाग, अखेर चालक जेरबंद
अपघातानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी कारचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर माणगाव-म्हसळा रस्त्यावरील साई गावाच्या हद्दीत वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर चालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी संबंधित फॉर्च्युनर कार जप्त केली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, तसेच अपघातामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
वाहतूक पोलिसालाच धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी चालकाला त्वरित पकडण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.

