(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी)
हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ला परिसरात दोन तरुणांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तातडीने कारवाई करत आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ टाकल्याच्या कारणावरून झालेल्या या भीषण मारहाणीमुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात ही घटना घडली होती. फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे फेरफटका मारण्यासाठी किल्ल्यावर गेले असताना आरोपी आणि त्यांचे साथीदार तेथे उपस्थित होते. “काल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर का टाकला?” या कारणावरून आरोपींनी दोघांशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर थेट मारहाणीला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी किल्ला परिसरात पडलेली लोखंडी शिग उचलून दोघांवर सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींसोबत असलेल्या १० ते १५ जणांनीही दोघांना घेरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जखमींना डोके, तोंड, हात, पाय आणि पाठीवर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये जेन अस्लम हुनेरकर (२२), मुफीज जावेद सोलकर (२३), सलाह हसन कोडविलकर (१९), नबिल निसार काझी (१९), जैब ताजुद्दिन जमादार (२६), हर्षद अझीम हुनेरकर (२५), नाईफ आरिफ श्रीवर्धनकर (१९) तसेच एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. सर्व आरोपी हर्णे बंदर मोहल्ला येथील रहिवासी आहेत. आरोपी क्रमांक १ ते ५ यांना २८ मे रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासादरम्यान संशयित आरोपी जेन हुनेरकर याच्याकडे चौकशी केली असता हर्षद हुनेरकर आणि नाईफ श्रीवर्धनकर यांचा सहभाग उघड झाल्याने त्यांनाही २९ मे रोजी अटक करण्यात आली.
या गंभीर गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून दापोली पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि दापोली पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल
दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), १८९(२), १९१(२), १९१(३) (बेकायदेशीर जमाव व हिंसक दंगल), १९० (अनधिकृत जमाव), ११५(२) (गंभीर दुखापत), ३५२ (शांतता भंग होईल अशी शिवीगाळ व उचकावणी) तसेच ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू ठेवला असून अन्य आरोपींचा सहभाग तपासला जात आहे.

