(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळीसरे नं. १ शाळेत झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाला चांगलेच भावले. आर्मी जवानांच्या कठीण जीवनशैलीची जिवंत अनुभूती देणारा हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
या सादरीकरणात रणगाडे, जेट विमान, रायफलधारी जवानांची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर स्फूर्तीगीते सादर करण्यात आली. आर्मीच्या वेशात सजलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या जोशपूर्ण आणि आकर्षक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. धुवांधार पावसात भिजून केलेल्या संचलन व देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या कवायतींना प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करून दाद दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे प्रेरणा – राजेंद्र जोशी, संकलन – विराज कोवळे, ध्वनी – उमेश चौघुले, एडिटिंग – मनुज कोवळे, कोरिओग्राफी – सिद्धी मोहिते, सहाय्य – जितेंद्र लोगडे, पारूनाथ गंधेरे, राजेंद्र गोताड, नितीन पिंपळे तर चित्रीकरण – ऋषी सोनावणे यांचा मोलाचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांच्या या देशभक्तीपर कलाकृतीचे कौतुक केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर संपूर्ण कोळीसरे परिसरातून होत आहे.

