(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गतवर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादाचे पडसाद अखेर पुन्हा उमटले असून, जुन्या वैमनस्यातून एका युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील तेलीआळी परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राकेश गोविंद मकाने (वय १९, रा. खालची आळी, रत्नागिरी) हा सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या मित्रासोबत तेलीआळी परिसरातील एका दुकानात खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी अमन म्हापुसकर हा तेथे आला. गतवर्षी गणेश विसर्जनावेळी झालेल्या वादाच्या कारणावरून त्याने राकेश याच्याशी हुज्जत घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत राकेश जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राकेश मकाने याने दिलेल्या फिर्यादीनुसार रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अमन म्हापुसकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

