(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले ३३ वर्षीय मुकुंद मुरलीधर पालांडे हे गुरुवारी दुपारी अचानक बेपत्ता झाल्याने चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अलोरे गावचे रहिवासी असलेल्या मुकुंद यांच्या बेपत्ता होण्यामागे धक्कादायक कारणे समोर येत असून, त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चार पानी पत्रामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
मुकुंद पालांडे यांनी चिपळूण पोलीस निरीक्षकांच्या नावे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात एचडीएफसी बँकेच्या चिपळूण शाखेतील चार जणांवर गंभीर आरोप केले आहेत. या चौघांकडून सातत्याने मानसिक छळ, दबाव आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या आरोपांमुळे बँक वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.
पत्रात त्यांनी आणखी एका धक्कादायक घटनेचाही उल्लेख केला आहे. दोन दिवसांपूर्वी विरेश्वर तलाव परिसरात काही तरुणांनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी लिहिले असून, त्यावेळी एका परिचित पोलिसाच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमके काय घडले, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि त्यांच्या पथकाला कोळकेवाडी येथील कॅनॉलजवळ मुकुंद यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे त्यांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. आज २३ मेच्या सकाळपासून या तपासाला अधिक वेग देण्यात आला असून, चिपळूणहून विशेष बोट मागवून कॅनॉल परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
पोलीस या चार पानी पत्राच्या आधारे बँकेतील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करत असून, मुकुंद यांच्या बेपत्ता होण्यामागील प्रत्येक शक्यतेचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालांडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कुटुंबीय चिंतेत आहेत. सध्या चिपळूण शहरातही या घटनेची दिवसभर चर्चा रंगली आहे.

