(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे सख्या चुलत भावाने लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार करून युवकाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव तिठा येथील श्री. कुरुप यांच्या चहाच्या टपरीसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी जखमी सिद्धेश मधुकर केळसकर (वय ३५, रा. कोंडगाव कातळवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रितम उर्फ पिंट्या प्रकाश केळसकर (वय ४१, रा. कोंडगाव कातळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी हे नात्याने सख्खे चुलत भाऊ असून एकाच घरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी सिद्धेश हे त्यांच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घरी परतत असताना आरोपीने त्यांना मोबाईलचे ‘सिम कार्ड’ मागितले. त्यावर “तुला दुसरे सिमकार्ड हवे असेल तर मी देतो,” असे सांगितल्याने आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने हातातील लोखंडी रॉडने सिद्धेश यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सिद्धेश गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत “तुझ्या आई-वडिलांसह संपूर्ण खानदान संपवून टाकेन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीला दारूचे व्यसन असून तो नेहमी घरातील सदस्यांना शिवीगाळ व त्रास देत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

