(फुणगूस / एजाज पटेल)
फुणगूस खाडी परिसरातील कोंडये देऊळवाडी येथे बुधवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने एका खोपटीच्या छतावर बसलेल्या वानरावर अचानक झडप घालत हल्ला केला. मात्र, भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या एका जवानाच्या प्रसंगावधानामुळे आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे बिबट्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वानराचे प्राण थोडक्यात बचावले.
अंधाराचा फायदा घेत छतावर झडप
रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास रवींद्र मुंडेकर यांच्या घराशेजारील लाकडाच्या खोपटीच्या छतावर एक वानर बसले होते. परिसरात शांतता असताना जंगलाच्या दिशेने आलेल्या बिबट्याने अचानक खोपटीवर चढून वानरावर झडप घातली. बिबट्याच्या तीक्ष्ण सुळ्यांनी आणि पंज्यांनी झालेल्या हल्ल्यामुळे वानराने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला.
जवानाचे धाडस; ग्रामस्थांची तातडीने मदत
वानराचा आक्रोश ऐकताच कृष्णा मुंडेकर यांच्या घरी वास्तव्यास असलेले भारतीय सैन्यातील जवान सुभाष येसणे हे क्षणार्धात घटनास्थळी धावले. समोर बिबट्या वानरावर हल्ला करत असल्याचे दिसताच त्यांनी निर्भीडपणे मोठ्याने आरडाओरडा करून बिबट्याला पिटाळण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून निलेश मुंडेकर, संतोष दसम, सागर शितप आणि मधुकर दसम हे ग्रामस्थ काठ्या व टॉर्च घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांचा गदारोळ आणि टॉर्चचा प्रकाश पाहून बिबट्याने जखमी वानराला सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.
रक्ताचे डाग पाहून ग्रामस्थ हादरले
बिबट्याच्या हल्ल्याची तीव्रता एवढी होती की खोपटीच्या कौलांवर आणि छतावर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसून आले. घरालगतच्या छतावर चढून बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे वन्यप्राणी आता मानवी वस्तीपर्यंत निर्धास्तपणे पोहोचत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मधल्या वाडीतही बिबट्याचा धुमाकूळ
देऊळवाडीपुरतीच ही समस्या मर्यादित नसून कोंडयेच्या मधल्या वाडी परिसरातही बिबट्याचा वावर वाढला आहे. सुभाष बाल्ये आणि बारगुडे यांच्या घराशेजारील खुराड्यात घुसून बिबट्याने कोंबड्यांची शिकार केल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही नागरिक धजावत नाहीत.
पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फुणगूस खाडी परिसरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. गावातील गोठ्यांमध्ये गायी, म्हशी, वासरे, शेळ्या-मेंढ्या आणि कोंबड्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. बिबट्या थेट घरांच्या परिसरात आणि खुराड्यांपर्यंत पोहोचत असल्याने पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी पहाटेपासून सायंकाळपर्यंत शेतात असतात. अशा परिस्थितीत गावात वाढलेल्या बिबट्याच्या वावरामुळे शेतात जाणे, रात्री घराबाहेर पडणे आणि लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने या परिसरात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

