(संगमेश्वर / एजाज पटेल)
काळाच्या ओघात आपल्या अनेक पारंपरिक सवयी, रूढी आणि संस्कृतीचे स्वरूप बदलत गेले. कधीकाळी ग्रामीण भागासह शहरांमधील लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक पंगतींची शान असलेल्या पानांच्या पत्रावळ्या आता हळूहळू इतिहासजमा होत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात तयार होणाऱ्या पळस किंवा केळीच्या पानांच्या पत्रावळींची जागा आता आधुनिक कागदी पत्रावळींनी घेतली आहे. बदल अपरिहार्य असला, तरी पंगतीत बसून पत्रावळीवर जेवण्याची रंगत आणि तृप्ती आजही कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्वी गावागावांत लग्नकार्य किंवा मोठे कौटुंबिक सोहळे असले की पळसाची पाने गोळा करणे आणि गव्हाच्या काड्यांनी ती शिवून पत्रावळी तयार करणे हा एक आनंददायी सामूहिक उपक्रम असायचा. त्या पत्रावळीवर वाढलेला गरम भात, वरण, भाजी आणि तुपाचा सुवास जेवणाची चव अधिक खुलवायचा. ही केवळ जेवणाची पद्धत नव्हती, तर निसर्गाशी जोडलेली आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली होती. मात्र, वाढते शहरीकरण, झाडांची घटती संख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे पारंपरिक पानांच्या पत्रावळ्या हळूहळू मागे पडल्या.
यानंतर बाजारात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळ्यांचा वापर वाढू लागला. सुरुवातीला त्या सोयीस्कर वाटल्या, मात्र पर्यावरणाला होणारे नुकसान आणि आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सुजाण नागरिकांनी त्यांना नकार दिला. या पार्श्वभूमीवर कागदी पत्रावळी हा पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय म्हणून पुढे आला. आज बहुतांश लहान-मोठ्या कार्यक्रमांमध्ये कागदी पत्रावळींचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.
कागदी पत्रावळींनी पंगतीची परंपरा जिवंत ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पारंपरिक पंगत असो किंवा आधुनिक टेबल-खुर्चीवरील जेवणाची व्यवस्था, समोर मांडलेल्या पत्रावळीमुळे जेवणाला एक वेगळीच रंगत येते. बुंदी, लाडू, मसालेभात, आमटी आणि तुपाची धार पत्रावळीवर पडली की जेवणाची खरी मजा अनुभवायला मिळते. बुफे पद्धतीत उभे राहून जेवण्यापेक्षा एकत्र बसून, गप्पा मारत आणि आग्रहाने वाढून घेतलेले जेवण अधिक समाधान देणारे ठरते.
रूप बदलले असले तरी सहभोजनाची भावना आजही तितकीच जिवंत आहे. पानांच्या पत्रावळ्यांची जागा कागदी पत्रावळींनी घेतली असली, तरी आपुलकीने एकत्र बसून जेवण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे सुरू असल्याचे या बदलातून स्पष्ट होत आहे.
“काळानुसार बदल होणे स्वाभाविक आहे. मात्र, बदल स्वीकारताना आपल्या परंपरेचे मूळ स्वरूप टिकवून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. पानांच्या पत्रावळ्यांची जागा कागदी पत्रावळींनी घेतली असली, तरी पंगतीत एकत्र बसून जेवण्यामागची आपुलकी आणि आनंद आजही कायम आहे. रूप बदलले, तरी सहभोजनाची संस्कृती टिकून आहे, ही आनंदाची बाब आहे.”
– सागर शेट्ये, संगमेश्वर
“आजकाल कार्यक्रमांमध्ये कागदी आणि थर्माकोलच्या पत्रावळ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. मात्र, महाराष्ट्रासह देशभरात सिंगल-यूज थर्माकोल पत्रावळ्या, प्लेट्स, कप, ग्लास, चमचे यांच्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून अनेक सिंगल-यूज प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी लागू केली आहे. थर्माकोल आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. गरम पदार्थांमुळे त्यातील रासायनिक घटक अन्नात मिसळण्याची शक्यता असते. शिवाय, थर्माकोलचे विघटन होत नसल्याने पर्यावरणावरही त्याचा गंभीर परिणाम होतो. याउलट कागदी पत्रावळी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सहज नष्ट होणाऱ्या आहेत. त्यामुळे पंगतीची परंपरा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कागदी पत्रावळींचाच वापर अधिक योग्य ठरतो.”
– निलेश कदम, संगमेश्वर

