( रत्नागिरी / वार्ताहर )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानामध्ये रत्नागिरी नवीन बसस्थानकाने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. या स्पर्धेतील विजेत्या आगार आणि बसस्थानकांचा सत्कार सोहळा १ जून २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई प्रदेश नियंत्रण समिती क्र. १ यांच्या वतीने यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. सन २०२५-२६ अंतर्गत आयोजित या अभियानात मुंबई प्रदेशातील विविध विभागांतील बसस्थानकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये रत्नागिरी नवीन बसस्थानकाने ‘अ’ गट प्रथम क्रमांक’ पटकावत विशेष कामगिरी केली आहे. तर ‘क’ गटात देवरुख आगारातील माखजन बसस्थानकाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या सत्कार समारंभाचे आयोजन १ जून रोजी सकाळी १० वाजता मुंबई प्रादेशिक कार्यालयात करण्यात आले असून, संबंधित बसस्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक आणि प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेत मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरू नगर, परळ, बोईसर, नालासोपारा, अलिबाग, रत्नागिरी नवीन, माखजन आणि ठाणे खोपट या बसस्थानकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. स्वच्छता, प्रवासी सुविधा, व्यवस्थापन आणि देखभाल यांसारख्या निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती.
जिल्ह्यातील रत्नागिरी नवीन बसस्थानकाला तसेच माखजन बस स्थानकाला मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे एसटी प्रशासनासह जिल्ह्यातील प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

