(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथे सुरू असलेल्या महामार्ग उड्डाण पुलाच्या कामामुळे या परिसरातील जनजीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेबाबत ठेकेदार कंपनीला जणू काही कणभरही भान राहिलेले दिसत नाही. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती खबरदारी, सुरक्षा भिंती, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा भीषण अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
संगमेश्वर एसटी आगार हे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. दिवस-रात्र वाहनांची ये-जा आणि प्रवाशांची सततची वर्दळ असते. या अशा अत्यंत संवेदनशील ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असूनही ठेकेदार कंपनीकडून सुरक्षेची कोणतीही किमान खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा फलक, अडथळे, प्रकाशयोजना किंवा वाहतूक नियोजन येथे काहीच ठिकाणी दिसत नाही.
ना डोक्यात हेलमेन्ट, ना पायात बूट काम करताना सेफ्टी बेल्टचा सुद्धा पत्ता नाही अशा पद्धतीने कामगारांची सुरक्षितता धोक्यात टाकून आणि प्रवासी जनतेच्या जीवाशी खेळ करून हे काम चालवत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. दररोज हजारो लोकांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी अशी निष्काळजी कामपद्धती म्हणजे एखाद्या मोठ्या दुर्घटनेला खुलेआम आमंत्रणच. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
महामार्गांवर खोदाई केलेल्या ठिकाणी रेडियम बॅरिकेटर्सचा पूर्ण अभाव असून रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशयोजना नसल्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. अंधारात खोदाईची ठिकाणे स्पष्ट दिसत नसल्याने वाहन चालकांना अचानकपणे अडथळे समोर येतात आणि त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सुरक्षेसारख्या मूलभूत बाबीकडे ठेकेदार कंपनीकडून होत असलेले दुर्लक्ष हे गंभीर निष्काळजीपणाचे निदर्शक असून महामार्गावरील प्रवाशांच्या जीवितास थेट धोका निर्माण करणारे आहे.
तळेकांटे ते आरवली दरम्यान ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला आणि महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षित कामकाजाला जनता कंटाळली आहे. अवघ्या चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरात किरकोळ तसेच भीषण अपघातांच्या मालिका घडत असून नाहक अनेकांना प्राण गमवावे लागले, तर काहीजण गंभीर जखमी होऊन आयुष्यभराच्या वेदनेला तोंड देत आहेत. रस्त्यावरील व डायव्हर्जन ठिकाणी उखडलेली पृष्ठभाग, सुरक्षाविना टाकलेली खोदाई, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि अंधारात गायब होणारे रस्ते या सर्वांचा थेट परिणाम म्हणजे वाढती दुर्घटना. ठेकेदाराच्या निष्काळजी वृत्तीला महामार्ग प्राधिकरणाची मौनमान्यता लाभत असल्याचा नागरिकांचा आरोप असून, या धोकादायक परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
उड्डाणपुलाचे काम महत्त्वाचे असले तरी सुरक्षेविना सुरू असलेले हे काम जीवघेणे ठरत आहे. ठेकेदार कंपनीला दिलेली जबाबदारी हास्यास्पदरीत्या पार पाडली जात असल्याचे चित्र समोर येत आहे आणि यामुळे नागरिकांत संताप वाढत आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षाव्यवस्था कडक करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

