(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा ते रत्नागिरी या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोड खडी आणि वाळू वाहतुकीचा प्रकार उघडपणे सुरू असून, वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. भर दिवसा रस्त्यावरून धावणाऱ्या जडवाहनांकडून सुरक्षेचे सर्व निकष धाब्यावर बसवले जात असून, यामुळे इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महामार्ग कामाशी संबंधित काही जडवाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात खडी-वाळू वाहून नेत असल्याचे भर शहरातील रस्त्यावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे या ट्रकवर आवश्यक असलेली ताडपत्री न घातल्याने प्रवासादरम्यान उडणारी धूळ, खडीचे कण आणि सैल साहित्य थेट मागील वाहनांवर येत असून दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. नियमांनुसार जडवाहनांवरील साहित्य झाकणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात रस्त्यावर वेगळेच चित्र दिसत असल्याने तपासणी यंत्रणांची कार्यक्षमता प्रश्नांकित होत आहे. वाहतुकीचे सर्व नियम सामान्य वाहनधारकांसाठीच लागू आहेत का, असा उपरोधिक प्रश्नही आता पुढे येत आहे.
विशेषतः महामार्ग ठेकेदार कंपनीशी संबंधित वाहनांकडूनच हा प्रकार अधिक प्रमाणात होत असल्याची चर्चा असून, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे दृश्यमानता कमी होत असून, अपघाताचा धोका वाढत आहे. रस्त्यावर अपघाताचा धोका वाढत असताना केवळ दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा रोष नागरिकांतून व्यक्त होत आहे. आरटीओ विभागाने तत्काळ कडक निर्देश देत सर्व जड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपत्री अनिवार्य करावी, ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण आणावे तसेच ताडपत्रीविना धावणाऱ्या ट्रकना थांबवून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

