(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रस्त्याची परिस्थिती आणि समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेता भरधाव ट्रक चुकीच्या बाजूने आणल्याने पावस बायपास मार्गावर दुचाकीस्वाराला जोरदार धडक बसली. या अपघातात ओंकार मधुकर शिंदे (वय ३५, रा. नाखरे, उंबरवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रकचालक समीर आत्माराम चव्हाण (वय ५१, रा. नाणीज, तळवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास समीर चव्हाण हा टाटा ११०९ ई एक्स ट्रक (एमएच ०९ सीयू १९७८) घेऊन रत्नागिरी-पावस बायपास मार्गावरून जात होता. दर्गा स्टॉपच्या पुढील वळणावर आल्यानंतर त्याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता ट्रक हयगयीने व बेदरकारपणे चालवला. यावेळी समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकलला (एमएच ०८ एई ७२२९) त्याने राँग साइडला जाऊन जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार ओंकार शिंदे यांना लहान-मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या. तसेच ट्रक आणि दुचाकी या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव शशिकांत कांबळे (वय ३४) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक समीर चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


