(बुलढाणा)
बुलढाणा जिल्ह्यातील एका कथित ऑनर किलिंग प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या तरुणीच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती, तीच तरुणी अचानक पोलीस स्टेशनमध्ये जिवंत हजर झाल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणाच हादरली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जंगलात सापडला होता अर्धवट जळालेला मृतदेह
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे शीर धडावेगळे करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तपासादरम्यान पोलिसांना मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाण्यात नोंदवलेली एका तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार मिळाली. ही तक्रार बापुराव नथू कळमेकर यांच्या मुलगी शिवानी कळमेकर हिच्याबाबत होती.
पोलिसांनी वडील आणि भावाला केली अटक
तपासासाठी बुलढाणा पोलीस मध्य प्रदेशात पोहोचले. चौकशीदरम्यान शिवानीचे वडील बापुराव कळमेकर यांच्या जबाबावर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी उलटतपासणी केली असता त्यांनी मुलीचा खून केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवानीचे लग्न झाले होते. मात्र, तिचे नात्यातील भावासमान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते. यामुळे संतापून वडिलांनी तिची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर मुलाचा मदतीने मृतदेह बुलढाण्यात आणून जंगलात जाळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी बापुराव कळमेकर आणि त्यांच्या मुलाला अटकही केली होती.
अचानक शिवानी पोलीस स्टेशनमध्ये जिवंत हजर
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. बुरहानपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर शिवानी कळमेकरने स्वतः आपल्या प्रियकरासोबत बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठत थेट आपण जीवंत असून माझ्या हत्याच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना आणि भावाला जळगाव जामोद पोलिसांनी जेलमध्ये ठेवले असल्याचा कबुली जबाब दिला असल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. तिला जिवंत पाहून पोलीसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे, राजुरा परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची डीएनए तपासणी न करताच पोलिसांनी थेट शिवानीचा खून झाल्याचा निष्कर्ष काढल्याचा आरोप होत आहे.
पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर पोलिसांच्या घाईगडबडीच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनी आरोप केला की, “माझा भाऊ आणि पुतण्या निर्दोष आहेत. पोलिसांनी मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने गुन्ह्याची कबुली घेतली.” या संपूर्ण प्रकरणामुळे एका जिवंत मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली तिच्या कुटुंबीयांना तुरुंगात जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मग तो मृतदेह कोणाचा?
शिवानी जिवंत समोर आल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, राजुरा जंगल परिसरात सापडलेला अर्धवट जळालेला मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा होता? त्या महिलेची हत्या कोणी केली, तिची ओळख काय आहे आणि या प्रकरणामागे नेमके कोण आहे, याचा आता नव्याने सखोल तपास करावा लागणार आहे.

